जत्रेहून परतले, नूडल्स खाल्ले अन् कायमचे झोपले! पाच मृत्यूंमागचं गूढ आणखी गडद

ग्रेटर नोएडामध्ये पती-पत्नी आणि तीन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता. मात्र, नूडल्समध्ये जाणीवपूर्वक विष मिसळल्याची शक्यता समोर आली आहे. मृत महेश यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या ऑडिओ नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Crime_UP_Noida

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रबुपुरा परिसरातील नगला श्री पदम गावात शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह घरातील एका खोलीत आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला नूडल्स खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाला कौटुंबिक संपत्तीच्या वादाचे गंभीर वळण मिळाले आहे.

रात्री जत्रेत गेले, सकाळी पाचही जण मृतावस्थेत!

मृतांमध्ये महेश (३७), त्यांची पत्नी ललिता (३५), मुलगा लाडू (११), मुलगी मिष्टी (७) आणि तीन वर्षांचा मुलगा साक्षात यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी हे कुटुंब गावातील जत्रेला गेले होते. रात्री सुमारे दहा वाजता घरी परतल्यानंतर सर्वांनी नूडल्स खाल्ले आणि झोपण्यासाठी गेले. मात्र, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कुटुंबातील पाचही सदस्य मृतावस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घरातील अन्नपदार्थांचे नमुने आणि इतर पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.

नूडल्समध्ये विष मिसळल्याचा संशय; वडिलांच्या भूमिकेची चौकशी

एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महेश यांनीच कुटुंबाने खाल्लेल्या नूडल्समध्ये विषारी पदार्थ मिसळला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

या घटनेमागे अनेक दिवसांपासून सुरू असलेला कौटुंबिक संपत्तीचा वाद कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महेश यांनी खरोखरच अन्नात विष मिसळले होते का, तसेच या पाच जणांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

मोबाईलमधील ऑडिओ नोटने तपासाला नवे वळण!

तपासादरम्यान पोलिसांना महेश यांच्या मोबाईलमध्ये एक महत्त्वाची ऑडिओ नोट सापडल्याचे वृत्त आहे. या नोटमध्ये महेश यांनी आपल्या दोन बहिणी आणि एका मेहुण्यावर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे.

संपत्तीच्या वाटणीवरून कुटुंबात दीर्घकाळ वाद सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित तीन नातेवाईकांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

महेश यांच्या नातेवाईक नीरज यांनीदेखील संपत्तीच्या वादामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण असल्याचा दावा केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

अन्नातून विषबाधा नव्हे, तर विषारी पदार्थामुळे मृत्यू?

या प्रकरणात अन्न सुरक्षा विभागाच्या प्राथमिक तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी ओ. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील खाद्यपदार्थांची पाकिटे आणि इतर साहित्याची तपासणी करण्यात आली. मात्र, तपासात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत.

मृतांना उलट्या किंवा जुलाब झाल्याची माहितीही समोर आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार सामान्य अन्नविषबाधेचा नसून विषारी पदार्थामुळे मृत्यू झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मृत मुलांपैकी एकाच्या तोंडातून फेस येत असल्याचेही आढळले होते.

आत्महत्या, हत्या की अन्य कारण? तपासातून सत्य समोर येणार

या घटनेमागे कौटुंबिक वादातून घडलेली सामूहिक आत्महत्या, जाणीवपूर्वक केलेली विषबाधा किंवा अन्य काही कारण आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

मोबाईलमधील ऑडिओ नोट, नातेवाईकांचे जबाब, शवविच्छेदनाचे निष्कर्ष आणि फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

एका रात्रीत पती-पत्नी आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने नगला श्री पदम गावावर शोककळा पसरली आहे. या पाच मृत्यूंचे नेमके कारण आणि त्यामागील जबाबदारी निश्चित करण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे.

Inline Article Ad 728x90