लातूरमध्ये एका तरुणाला नग्न करून पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचाही आरोप करण्यात आला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, अन्य तीन ते चार जणांचा शोध सुरू आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक जण रॅपिडो चालक असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सभेने रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी, चालक-प्रवाशांची अनिवार्य पडताळणी आणि कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन आणि एकदिवसीय बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून एका सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये समोर आला आहे. मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याप्रकरणी रविराज चिखले याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दळवी यांचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करणाऱ्या तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. मात्र, आरोपींच्या अटकेनंतर कोटा पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मुंबई आणि राजस्थान पोलिसांमध्ये श्रेयवादाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केलेल्या सूचक पोस्टमुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार करण्यात आल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने ऑडिओ संदेशाद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. सलमान खानसोबत काम करत असल्यामुळे टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा या संदेशात करण्यात आला आहे. तसेच सलमान खानसोबत काम करणाऱ्या इतर कलाकारांनाही धमकी देण्यात आली आहे. मात्र, या ऑडिओ संदेशाची सत्यता आणि बिश्नोई गँगचा प्रत्यक्ष सहभाग अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १५ वर्षीय शाळकरी मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महिलांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे.
ग्रेटर नोएडामध्ये पती-पत्नी आणि तीन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता. मात्र, नूडल्समध्ये जाणीवपूर्वक विष मिसळल्याची शक्यता समोर आली आहे. मृत महेश यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या ऑडिओ नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणी दामिनी पालव हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाला नकार दिल्याने आणि तरुणीचे लग्न ठरल्याच्या रागातून हा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी संशयित साहिल धुरीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील पर्वती पायथा परिसरात बहुउद्देशीय हॉलच्या उभारणीवरून एका ५८ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना ठाणे गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्या आरोपींसमोर त्यांची चौकशी करण्यात येत असून, या तपासातून हत्येमागील कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने धाडसाने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, निगडी पोलिसांनी संशयित कामगाराला ताब्यात घेतले आहे.
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात 20 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लॉजवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून, ईश्वरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे उर्फ चोंग्या याला अटक केली आहे. पीडितेकडून लाखो रुपये आणि महागडी कार घेतल्याचाही आरोप असून, आरोपी इतर तरुणींनाही अशाच प्रकारे फसवत होता का, याचा पोलीस तपास सुरू आहे.
पुण्यात अवघ्या 22 तासांत 123 मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी रील आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पुणे पोलिसांनी संबंधित पोलीस ठाणी, गुन्हे शाखा, ऑडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती, सोसायटी पदाधिकारी आणि इतरांकडून पडताळणी केली. मात्र या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही अधिकृत नोंद किंवा ठोस पुरावा आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांना अप्रमाणित माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.
गुजरातमधील राजकोट येथे एका भाजी विक्रेत्याने इन्स्टाग्राम रील्स आणि टेलिग्रामवरील माहितीच्या आधारे घरातच 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत प्रिंटर, लॅमिनेटर मशीन, कागद आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला अंदाजे 35 ते 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून, वर्सोवा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील एका क्लिनिकमध्ये तब्बल चार वर्षांपासून 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह जतन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने कुटुंबाने मृतदेह क्रायोनिक्स प्रक्रियेसाठी अमेरिकेत पाठवण्याचा विचार केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकाराच्या कायदेशीरतेबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, त्यानेच इतर आरोपींना कार्यालयात आणून हल्ल्याचा कट रचण्यात मदत केल्याचा पोलिस तपासातील दावा आहे. अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे.
दिल्ली पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत बावाना येथील महिला आरोपी पार्वतीच्या घरातून तब्बल 56.69 लाख रुपयांची रोकड, 355 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 161 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात पार्वतीसह तिचा अंगरक्षक आणि राजस्थानमधील कथित ड्रग्ज पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून राजस्थानपर्यंत पसरलेल्या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचा पोलीस तपास करत आहेत.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे. आरोपपत्रातील माहितीचा हवाला देत त्यांनी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. तसेच साक्षीदारांना संरक्षण देऊन या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची आणि सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाच्या विक्रीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. जन्मदात्यांनी १ लाख २० हजार रुपयांत विकलेल्या बाळाचे पुढील ४८ तासांत आणखी व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. नांदेडमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली असून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला संस्थेकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
आजारपण आणि कौटुंबिक संकटे दूर करण्याचे आमिष दाखवून धुळ्यातील मजूर कुटुंबाची १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी विधी करत महिलेच्या डोळ्यांत लिंबाचा रस पिळल्याचा, तसेच तिच्या २१ वर्षीय मुलीचा जबरदस्तीने साखरपुडा केल्याचा आरोप आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.