लातूरमध्ये एका तरुणाला नग्न करून पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचाही आरोप करण्यात आला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, अन्य तीन ते चार जणांचा शोध सुरू आहे.
औसा येथील जिल्हा परिषद शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत चित्रीकरण केल्याप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण, शिक्षकांच्या कामात अडथळा आणि धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, याच शाळेत ‘स्कूल चलो’ अभियानांतर्गत पाहणी करत दिपकेंनी खासगी शाळेतील विद्यार्थी आढळल्याचा दावा केला होता. आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पाहून अभिजीत दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पाहणीदरम्यान शाळेची रखडलेली कामे, सुविधांचा अभाव आणि ग्रामस्थांच्या तक्रारीही समोर आल्या.
लातूरच्या औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत खासगी शाळेचे विद्यार्थी आढळल्याचा दावा ‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी पाहणी केली असता काही विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेतील असल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती न मिळाल्याने त्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे धाव घेतली असून, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.