आंदोलनांच्या माध्यमातून देशात फूट पडू नये! मोहन भागवतांचा नेत्यांना संदेश

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी जागतिक परिस्थिती, भारतासमोरील आव्हाने, आंदोलनांचे उद्देश आणि राष्ट्रीय एकतेवर भाष्य केले. भारताविरुद्ध आसुरी शक्ती सक्रिय असल्याचे सांगतानाच, लोकशाहीतील आंदोलनांचा उद्देश समस्यांचे निराकरण असावा आणि समाजात फूट पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Mohan_Bhagvat

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी उत्सव 2026 मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतासमोरील जागतिक आव्हाने, देशातील आंदोलने आणि सामाजिक एकतेच्या महत्त्वावर भाष्य केले. पाश्चिमात्य जगातून सांस्कृतिक मूल्ये आणि मानवी संस्कार नष्ट करणारे वादळ घोंघावत असल्याचा दावा करत भारताने अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताविरुद्ध आसुरी शक्ती सक्रिय असल्याचा दावा

मोहन भागवत म्हणाले की, भारताची प्रगती काही शक्तींच्या हेतूंना बाधा पोहोचवू शकते. त्यामुळे भारतालाही या जागतिक घडामोडींचे लक्ष्य बनवले जात आहे. काही लोक आणि अतिमहत्त्वाकांक्षी नेते अशा शक्तींना साथ देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ सत्ताबदल किंवा 'रेजीम चेंज' केल्याने परिस्थिती बदलत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

'आंदोलनांचा उद्देश समस्यांचे निराकरण असावा'

लोकशाहीमध्ये आंदोलने होणे स्वाभाविक आहे; मात्र आंदोलनांचा मूळ उद्देश समस्यांचे निराकरण हा असला पाहिजे, असे भागवत यांनी स्पष्ट केले. आंदोलनांमुळे देशात आणि समाजात फूट पडू नये. तसेच आंदोलने राज्यघटनेच्या मर्यादेत झाली पाहिजेत, याची जाणीव नेत्यांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.

केवळ आंदोलनांवर अवलंबून न राहता समाजाचा सक्रिय सहभाग आणि परस्पर संवाद वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंदोलनांचा उद्देश वेगळा असेल, तर त्यांना राजकीय स्वरूप प्राप्त होऊ शकते. अशा आंदोलनांमुळे शत्रुत्वाची भावना वाढण्याची शक्यता असून, देशविरोधी शक्ती त्याचा फायदा घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

विकासाच्या संकल्पनेवर पुनर्विचार करण्याची गरज

नेपाळमधील नैसर्गिक संकटांचा आणि हिमालयीन क्षेत्रातील आव्हानांचा उल्लेख करत भागवत यांनी विकासाच्या संकल्पनेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली. विकासाच्या नावाखाली मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

'सर्व भारतीयांनी एक असल्याची भावना जपावी'

राष्ट्रीय एकता आणि सामर्थ्य यावर भर देताना भागवत म्हणाले की, भारतीय समाजात पूजा पद्धती, खानपान, राहणीमान किंवा सामाजिक-राजकीय विचारांमध्ये विविधता असू शकते. मात्र, सर्व भारतीयांनी एक असल्याची भावना जपली पाहिजे.

देश आपल्याला काय देतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Inline Article Ad 728x90