केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट! आता उज्ज्वल निकम लढणार खटला
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पुणे : सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या मात्र पोलीस तपासात हत्येचा कट उघड झालेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या बहुचर्चित खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनच्या वडिलांनी या नियुक्तीची माहिती दिली असून, आता संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
5,053 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?
पुणे ग्रामीण पोलिसांनी या हत्याप्रकरणात तब्बल 5,053 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात सिया गोयल, तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांच्या कथित सहभागाचा तपशील देण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईलमधील संभाषणे, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल सर्च हिस्ट्री आणि साक्षीदारांचे जबाब यांसारखे महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर आरोपींनी इंटरनेटवर केलेल्या शोधांचाही आरोपपत्रात समावेश असल्याचे वृत्त आहे.
आधी रेकी, नंतर हत्येचा कट?
पोलिसांच्या तपासानुसार, 25 मे रोजी केतनची हत्या करण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर 31 मे रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले होते. याच भेटीदरम्यान सियाने परिसराची पाहणी करून हत्येसाठी योग्य जागा निश्चित केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
केतन आणि सिया 6 जून रोजी बालीला जाणार होते. मात्र, हा प्रवास रद्द व्हावा यासाठी केतनचा पासपोर्ट कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यानंतर 14 जून रोजी लोहगडावर हत्येचा प्रयत्न करण्याचा कट आखण्यात आला होता, मात्र तो पूर्णत्वास गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अखेर 18 जून रोजी केतनचा लोहगडावरून दरीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप पुढे आला.
उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीमुळे खटल्याला नवे वळण
केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. त्यानुसार नियुक्ती झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या निर्णयाबद्दल अग्रवाल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आपल्या मुलाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलीस तपासातील डिजिटल पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींच्या कथित कटासंबंधीची माहिती न्यायालयात किती निर्णायक ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत.