एका भरधाव कारने नाशिकमध्ये घडवलं मृत्यूचं थैमान! दुचाकी, कार अन् पोलिसांना धडक; १ ठार, ११ जखमी
नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी मध्यरात्री भीषण अपघात घडला. नांदुरी-अभोणा टी-पॉईंट परिसरात भरधाव कारने दुचाकी आणि दुसऱ्या कारला धडक दिल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनाही उडवलं. या दुर्घटनेत पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला असून, पोलीस कर्मचारी आणि भाविकांसह ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर मध्यरात्री काळाने घाला घातला. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी-अभोणा टी-पॉईंट परिसरात एका भरधाव मारुती सियाज कारने अक्षरशः धडकांची मालिका घडवली. सुरुवातीला दुचाकी, त्यानंतर समोरून येणाऱ्या कारला धडक देत अनियंत्रित वाहन थेट पोलीस बॅरिकेड्स आणि बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आदळलं. या भीषण अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
आधी दुचाकीला धडक, नंतर थेट पोलिसांवर कार आदळली!
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरी येथील अभोणा टी-पॉईंटवर रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, दिनकर मुंडे आणि हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्यासह अन्य कर्मचारी कर्तव्य बजावत होते.
दरम्यान, मध्यरात्री दीडच्या सुमारास नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती सियाज कारने स्पीड ब्रेकरजवळ एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या चुकीच्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकली. एवढ्यावरच न थांबता कारने रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या पोलीस बॅरिकेड्सना धडक देत बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही उडवलं.
पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू
या अपघातात पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत पोलीस अधिकारी दिनकर मुंडे यांच्या पायाला दुखापत झाली, तर हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्या डाव्या पायाच्या पंजाला फ्रॅक्चर झालं. मुंबईतील ५२ वर्षीय मोरेश्वर बाळू पाटील यांच्याही डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींना वणी आणि नाशिकच्या रुग्णालयात हलवलं
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही जखमींना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आलं.
समोर आलेल्या जखमींच्या नावांमध्ये दिनकर मुंडे, सचिन राऊत, कपिल साळी, मोरेश्वर पाटील, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव आणि राधाबाई गावित यांचा समावेश आहे.
भरधाव कारवरील नियंत्रण नेमकं कसं सुटलं?
नवरात्रोत्सवामुळे सप्तशृंगी गड परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असताना हा अपघात घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास सुरू आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या परिस्थितीचा आणि वाहनचालकाच्या भूमिकेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू आणि अनेकांच्या जखमी होण्यामुळे या घटनेने नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.