‘पदवीधर असूनही १० हजार मतं बाद?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक सवाल; सांगलीतील वक्तव्याची चर्चा!

सांगलीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाद होणाऱ्या मतांवरून मिश्किल टोला लगावला. राज्यातील गुंतवणूक, रोजगार, शिक्षकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान, संभाजी भिडे आणि फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.

Devendra_Fadanvis

सांगली : राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील प्रचारसभेत केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मते बाद होत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल,’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत फडणवीस यांनी शिक्षकांच्या समस्या, राज्यातील औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला.

शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न महायुती सरकारने सोडवले – फडणवीस

राज्यातील शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न सोडवण्याचे काम महायुती सरकारने केल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील औद्योगिक विकासाबाबत बोलताना गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाल्याचा दावा त्यांनी केला. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून नवीन उद्योगांच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीतही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण काम केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीजबिल माफीसारखे निर्णय घेण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीतही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत

पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजप महायुतीकडून शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे, तर पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघात हर्षदा जाधव-देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचाही प्रचार सुरू असल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

संभाजी भिडे आणि फडणवीस यांची भेट; चर्चेबाबत मिश्किल उत्तर

दरम्यान, सांगली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली.

या भेटीनंतर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना चर्चेबाबत विचारले असता त्यांनी मिश्किल उत्तर दिले. ‘आपली काय चर्चा झाली आहे, हे कोणाला सांगू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत,’ असे भिडे यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Inline Article Ad 728x90