‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ कार्यक्रमाची घोषणा; 9 नोव्हेंबरला पुण्यात रंगणार खास सोहळा!
मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेवर कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावून पाहुणचार न केल्याचा आरोप करत व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर अथर्व सुदामेने माफी मागतानाचा व्हिडीओ पोस्ट केला असून, ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कुशल बद्रिकेच्या व्हिडीओमुळे या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे

पुणे : मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता कुशल बद्रिके आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अथर्व सुदामेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अथर्व सुदामेनेही एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. त्याचबरोबर त्याने ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ या कार्यक्रमाची घोषणाही केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके याने अथर्व सुदामेबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने अथर्वने कलाकारांना घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं; मात्र तिथे गेल्यानंतर कोणालाही कांदेपोहे खायला मिळाले नाहीत, अशी तक्रार विनोदी शैलीत केली.
कुशल बद्रिकेने व्हिडीओमध्ये म्हटलं की, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्याला असा अनुभव पहिल्यांदाच आला. व्हिडीओच्या माध्यमातून एखाद्याची मस्करी करणं वेगळं; पण घरी बोलावून पाहुण्यांचा अपमान करणं योग्य नसल्याचंही त्याने म्हटलं. त्याच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली.
अथर्व सुदामेने व्हिडीओ शेअर करत मागितली माफी
कुशल बद्रिकेच्या व्हिडीओनंतर अथर्व सुदामेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने कांदेपोहे खायला न घातल्याबद्दल माफी मागितल्याचं विनोदी पद्धतीने सांगितलं.
अथर्व म्हणाला, “नमस्कार मित्रांनो, मी हा व्हिडीओ याकरिता बनवतोय की, मला माफी मागायची आहे. मी कलाकारांना घरी बोलावलं आणि त्यांना साधे कांदेपोहेसुद्धा खायला घालू शकलो नाही. त्यामुळे कलाकार माझ्यावर चिडलेत, लोक पण माझ्यावर चिडलेत.”
पुढे त्याने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केल्याचं सांगितलं.
‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ कार्यक्रमाची घोषणा
अथर्व सुदामेने ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम केवळ कलाकारांसाठी नसून सर्व चाहत्यांसाठी खुला असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं.
अथर्वच्या माहितीनुसार, हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना तिकीट काढावं लागणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
त्यामुळे कुशल बद्रिकेच्या व्हिडीओनंतर सुरू झालेली चर्चा आता अथर्वच्या कार्यक्रमाच्या घोषणेमुळे अधिक रंगतदार झाली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता
अथर्व सुदामेच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी उत्सुकता दाखवली आहे.
कुशल बद्रिकेचा व्हिडीओ आणि त्यानंतर अथर्वने दिलेलं उत्तर पाहता, या संपूर्ण प्रकरणात विनोदी शैलीतून कार्यक्रमाचं प्रमोशन करण्यात आल्याचं दिसतं. मात्र, कार्यक्रमात नेमकं काय पाहायला मिळणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.